शिरपूर : शिरपूर शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे व कोरोनापासून जनतेचे रक्षण व्हावे म्हणून शिरपूर शहरातील आर. सी. पटेल मेन बिल्डिंग येथे कोविड-१९ लसीकरण मोहीमेचे शहरातील क्रमांक दोनचे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.
लसीकरण मोहीम प्रभावी व गतिमान पद्धतीने व्हावी, रुग्णांना दिलासा मिळावा म्हणून माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्या सहकार्याने व आरोग्य विभाग यांच्या वतीने नॅशनल अर्बन हेल्थ मिशन अंतर्गत आज १० मे २०२१ रोजी शहरातील आर. सी. पटेल मेन बिल्डिंग येथे दुसऱ्या लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी तहसीलदार आबा महाजन, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रसन्न कुलकर्णी, नगरपरिषदेच्या आरोग्य अधिकारी नितु बत्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.
या लसीकरण केंद्रात १८ ते ४४ वयोगटातील युवा वर्ग, नागरिकांना कोव्हॅक्सीन लस देण्यात येत आहे.
लसीकरण केंद्रांची संख्या वाढल्यास कमी गर्दीत लोकांना लसीकरणाच्या लाभ घेता येईल, या उद्देशाने पटेल परिवाराने इमारत उपलब्ध करून दिली आहे. शासनाला व प्रशासनाला लसीकरण मोहीम राबविण्यासाठी अजून इमारतींची गरज भासल्यास आ. अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल हे अजून इमारती उपलब्ध करून देण्यासाठी तयार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे.
शिरपूर शहर व तालुक्यातील जनतेने कोरोना पासून बचाव होण्यासाठी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आमदार अमरिशभाई पटेल, आ. काशिराम पावरा, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी केले आहे.