शिरपूर शहरातील लसीकरण मोहिमेला पटेल परिवाराचे संपूर्ण सहकार्य
क्रांतीनगर शिरपूर येथील आर. सी. पटेल मराठी प्राथमिक शाळेच्या लसीकरण केंद्राचा नागरिक घेत आहेत लाभ.
लसीकरण मोहीम प्रभावी व गतिमान पद्धतीने व्हावी, रुग्णांना दिलासा मिळावा म्हणून माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या सहकार्याने व आरोग्य विभाग यांच्या वतीने एन. यू. एच. एम. (नॅशनल अर्बन हेल्थ मिशन) केंद्र अंतर्गत दि. ४ मे २०२१ पासून क्रांतीनगर येथील या शाळेत लसीकरणाला सुरुवात झाली. शासनाच्या नियमानुसार कोरोनाच्या नियमांचे पालन करून दररोज २०० व्यक्तींना लसीकरण याठिकाणी करण्यात येत आहे.
विशेष बाब म्हणजे, माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांनी क्रांतीनगर शाळेत लसीकरण करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना उन्हापासून बचाव व्हावा म्हणून सावलीसाठी मंडप, बसण्यासाठी सर्वांना खुर्च्या, पिण्याच्या चांगल्या थंड पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे. या लसीकरण केंद्रात १८ ते ४४ वयोगटातील युवा वर्ग, नागरिकांना लस देण्यात येत आहे.
लसीकरण केंद्रांची संख्या वाढल्यास कमी गर्दीत लोकांना लसीकरणाच्या लाभ घेता येईल, या उद्देशाने पटेल परिवाराने शाळेची इमारत उपलब्ध करून दिली आहे. शासनाला व प्रशासनाला लसीकरण मोहीम राबविण्यासाठी अजून इमारतींची गरज भासल्यास आ. अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल हे अजून इमारती उपलब्ध करून देण्यासाठी तयार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे.
शिरपूर शहर व तालुक्यातील जनतेने कोरोना पासून बचाव होण्यासाठी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आमदार अमरिशभाई पटेल, आ. काशिराम पावरा, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी केले आहे.